Abhay Shivgounda Patil

About what matters.

बोलाचे साहित्य बोलाचेच विश्व, रंकाचे धन आणि रावांचे कवित्व ॥

leave a comment »

चाकोरीबाहेरच्या कल्पना लढवून नवीन पायंडा पाडणं हे बे एरियातल्या मंडळींचं व्यवच्छेदक लक्षण आहे.  कॅलिफोर्नियाला अमेरिकेची अमेरिका म्हणतात.  कित्येक मराठी उद्योजकांची आणि नोकरदारांची ही कर्मभूमी.  विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नवीन लखलखीत  पाऊलवाट उमटवण्याची पात्रता आणि क्षमता इथे नक्कीच आहे.   पण ते सोडाच महाराष्ट्रातल्या करदात्यांच्या पैशाने साता समुद्रापार साजरा होणारा एक मनोरंजनाचा  कार्यक्रम या पलीकडे काहीच घडतांना दिसत  नाही आहे!

पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाबद्द्ल काही लिहावं असं मला वाटत नव्हतं.   बे एरियात मी सहा सात वर्षं राहिलो.  पंधरा वर्षांपूर्वी बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीवर काम केलं.   देवनागरी फॉंट अजून रुळली नसल्यानं हस्तलिखीत पत्रकं पोस्टानं पाठवण्याचे दिवस अजूनही आठवतात.   तरीसुध्दा होऊ घातलेल्या पहिल्या विश्व साहित्यसंमेलनाचं काही अप्रूप वाटत नव्हतं.  पण एके दिवशी बातमी थडकली की आयोजकांनी महाराष्ट्र शासनाकडे अनुदान मागितलं आणि मा. मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी रुपये पंचवीस लाख मंजूरही केले!  त्या बातमींने माझ्यातला लेखक – आणि कवी सुध्दा – जागा झाला आणि मी लगोलग विमसासं साठी एक लयबध्द घोषवाक्य रचलं  – तेच या लेखाचं शीर्षक.

कुणी कुठे संमेलन भरवावं, किती पैसे खर्च करावेत, कोणाला बोलवावं आणि ते कसं साजरं करावं याबाबत कुणा तिसर्‍याला काही घेणं देणं असायचं  कारण नाही.  पण जेंव्हा अमेरिकेसारख्या प्रगत देशातले सुखवस्तू मराठी भगीरथ, थोडसं विश्व  थोडसं साहित्य आणि बहुतांशी मनोरंजन असा घाट घालून, अनुदानाची उलटी गंगा महाराष्ट्रातून कॅलिफोर्नियाकडे वळवतात तेंव्हा मात्र निश्चित भूमिका घेउन प्रश्न विचारणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच ठरतं. प्रश्न आता आवड-निवड किंवा मतभेदाचा नाही तर नैतिकतेचा झालेला असतो.

प्रथम थोडसं अमेरिकेतल्या देशी लोकांबद्दल.  भारतातून जेंव्हा मंडळी अमेरिकेत स्थिरावतात तेंव्हा ती खूप बदलतात.  ते कचरा रस्त्यावर फेकत नाहीत.  वाहतूकीच्या नियमांच पालन करतात.  वेळेवर आणि संपूर्ण इंकम टॅक्स भरतात – इतकच काय सेल्‍स टॅक्स वाचवण्य़ाचा विचार न करता पावतीचाही आग्रह धरतात.  लाच न देता, स्वत: शासकिय (अमेरिकन) कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स मिळवतात.  भारतात सुट्टीला आलेले असले तरी पोस्टाने मतदान करतात.  कधीही रांग मोडत नाहीत वगैरे.  अनेक अर्थांनी ती अतर्बाह्य स्वच्छ, नीतिमान आणि पारदर्शक होऊन जातात.  भ्रष्टाचार – प्रत्यक्ष, लाक्षणिक अथवा नैतिक – त्यांना स्पर्शही करत नसतो.

हल्ली मात्र या नंदनवनात कुठेतरी कसर लागलेली आहे असं जाणवू लागलय.    अनेक मराठी नाटकं आणि सिनेमे (VCD/ DVD) निर्मात्याची परवानगी न घेता, स्वामित्वहक्काची तमा न बाळगता, अमेरिकेत राजरोस विकली जातात.  काही दिवसांपुर्वी माहितीचा अधिकार (Right to Information) वापरून एका नागरिकाने जी माहिती उजेडात आणली ती फार अस्वस्थ करणारी आहे.   दुष्काळ, भूकंप, पूर अशा आपत्तींग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राखीव असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या निधीतून पैसे घेऊन एका नाटक कंपनीने व्यावसायिक मराठी नाटकांचा अमेरिका दौरा केला – आणि त्यांना त्याबद्दल कुणी विचारलं नाही.  थोडक्यात, अमेरिकेत आदर्श इमिग्रंट म्हणून वावरणारा भारतीय वंशाचा माणूस स्वजनांशी वागतांना मात्र कधी कधी मूळ स्वभावावर जातो असं दिसू लागलेलं आहे.  मी या प्रकाराला i2i interaction म्हणजे Indian to Indian interaction असं नाव दिलेलं आहे.  एक भारतीय माणूस वा संस्था दुसर्‍या भारतीय माणूस वा संस्थेच्यासमोर ठाकला की “मूळ स्वभाव जाईना” हे दृष्य पहायला मिळण्याची शक्यता खूप जास्त असते.  भारतीय वकिलातीत भारतीय वंशाच्या लोकांना येणारे अनुभव बहुतेक वेळा याच धाटणीचे असतात.

आता वाचकांना हा प्रश्न पडला असेल की या i2i वगैरेचा इथे संबंध काय?  मी हे निदर्शनास आणू देऊ इच्छितो की विश्वसाहित्य संमेलनाच्या अनुदानाबाबत जे घडतय ते  या घसरणार्‍या मुल्यांच्या थिअरीत बरोबर बसतं!   संमेलनाची वेबसाईट जर पाहिलीत (मी हे फेब्रुवारी २००९ मधे लिहीतोय) तर तिथल्या आठ छायाचित्रात एकही साहित्यिक दिसणार नाही!  कार्यक्रम पत्रिकेत विवीधकलागुणदर्शनाचे आणि “हसा चकट फू”  सारखे धमाल विनोदी कार्यक्रम पहायला मिळतील.  पुन्हा एकदा मला सांगावसं वाटतं की कार्यक्रमांचा दर्जा आणि औचित्य मला खटकतयं हे खरं – पण माझं दुखणं वेगळं आहे.  या मेळाव्यासाठी अमेरिकेतल्या मंडळाने महाराष्ट्र शासनाकडे अनुदान मागावं हा एक प्रकारे नैतिक भ्रष्टाचारच आहे असं मला वाटतं.

त्याच वेळी हे दुसरं चित्रही पहा.  दर दोन वर्षांनी होणारं बृहन महाराष्ट्र अधिवेशन याच वर्षी (२००९) जुलै मधे फिलाडेल्फियाला होतय.  हजोरोंच्या संख्येने उत्तर अमेरिकेच्या काना-कोपर्‍यातून मराठी लोक या संमेलनासाठी येतात.  मुख्य उद्दिष्ट मनोरंजाचं असतं – पण त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तिंनाही आवर्जून बो्लावलं जातं.  महाराष्ट्र शासनाने  अधिवेशनासाठी अनुदान जाहीर करायचं – आणि आयोजकांनी ते नाकारायचं अशी प्रथाच पडून गेलेली आहे.  यावर्षी  आयोजकांनी शासनाला जाहीर विनंती केली आहे की आता तुम्ही अनुदानाची घोषणा करायचं थांबवा!  अमेरिकेतली महाराष्ट्र फौंडेशन ही संस्था दरवर्षी सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात वेगळी वाट चोखाळणार्‍यांना भरीव पारितोषिकं देते.  कॅनडातली महाराष्ट्र सेवा समिती सामाजिक कार्याबरोबर मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रात काम करते.  खुद्द कॅलिफोर्नियात कॅलिफोर्निया आर्टस् असोसिएशन (कला) ही संस्था नाट्य आणि कला क्षेत्रात दस्तावेजीकरणाचं काम करत आहे.  अशी अनेक उदाहरणं आहेत.  थोडक्यात, उत्तर अमेरिकेतल्या अनेकांनी आपला वेळ, पैसा आणि क्षमता भारतातल्या सामाजिक आणि कला क्षेत्रासाठी वापरण्याचा वसा पेललेला आहे.  पण आज प्रथमच हे आक्रीत घडतयं की अमेरिकेतल्या एका मेळाव्यासाठी थेट महाराष्ट्र सरकारकडून देणगी मागितली जातेय!

खरं तर मनात ठसठसणारी वेदना याही पेक्षा व्यापक आहे हे कबूल करायला हवं.  चाकोरीबाहेरच्या कल्पना लढवून नवीन पायंडा पाडणं हे बे एरियातल्या मंडळींचं व्यवच्छेदक लक्षण आहे.  कॅलिफोर्नियाला अमेरिकेची अमेरिका म्हणतात.  कित्येक मराठी उद्योजकांची आणि नोकरदारांची ही कर्मभूमी.  विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नवीन लखलखीत  पाऊलवाट उमटवण्याची पात्रता आणि क्षमता इथे नक्कीच आहे.   पण ते सोडाच महाराष्ट्रातल्या करदात्यांच्या पैशाने साता समुद्रापार साजरा होणारा एक मनोरंजनाचा  कार्यक्रम या पलीकडे काहीच घडतांना दिसत  नाही आहे!

(हा लेख लोकसत्ता वॄत्तपत्रात २००९ साली फ्हेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द झाला. सॅन होजे कॅलिफोर्निया येथे हो‍उ घातलेल्या पहिल्या विश्व संमेलनाच्या निमित्ताने लिहीलेला.)

Advertisements

Written by Abhay Shivgounda Patil

August 25, 2012 at 6:11 pm

Posted in Uncategorized

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: