Abhay Shivgounda Patil

About what matters.

दोन स्थलांतरांची गोष्ट – भाग २ (परक्यांचा़च देश!)

leave a comment »

Nation of Immigrants (Photos courtesy Wikipedia)

रुझवेल्ट आणि चंद्रशेखर (Photos courtesy Wikipedia)

“कितीही झालं तरी आपण तिथे परकेच असा ग्रह होता. पण पुढे लक्षात आलं की हा देशच मुळी परक्यांचा आहे!  अमेरिकेचे एक अध्यक्ष रूझवेल्ट यांनी एका भाषणाची सुरूवात  “my fellow immigrants” अशी केली होती असं वाचलेलं आठवतं.” स्थलांतराच्या गोष्टीचा भाग दुसरा. English version साठी इथे टिचकी मारा!   (आधीची गोष्ट – भाग १ इथे पहा.)

अमेरिकेची वाट धरतांना हिशेब साधा होता. उत्तम काम, त्याहूनही उत्तम मोबदला आणि जगातल्या सर्वात श्रीमंत देशामधे रहाण्याची संधी असा तो मामला होता. असा विचार करतांना तिथेच कायम रहाण्याचं मत्र मनात मुळीच नव्हतं. अमेरिकेत कायमचे स्थायिक झालेले भारतीय हे देशद्रोहीच वाटायचे. हरगोविंद खुराणा, चंद्रशेखर हे नोबेल विजेते अमेरिकन पासपोर्टधारी आहेत याचं फार वैषम्य वाटायचं. आता मात्र तसं काहीही वाटत नाही. आपण कुठल्या देशाचे नागरिक आहोत, कुठे रहातो हा केवळ तपशिलाचा भाग आहे. त्याच्या पलीकडे आपली मुल्यं काय आहेत आणि आपल्या कृतीतून आपण त्या मुल्यांशी किती प्रामाणिक आहोत हे जास्त महत्वाचं.

कुठेही गेलं तरी शेवटी कायमचं मातृभूमीत परत यायलाच हवं असं तेंव्हा वाटायचं. कितीही झालं तरी आपण तिथे परकेच असा ग्रह होता. पण पुढे लक्षात आलं की हा देशच मुळी परक्यांचा आहे!  अमेरिकेचे एक अध्यक्ष रूझवेल्ट यांनी एका भाषणाची सुरूवात  “my fellow immigrants” अशी केली होती असं वाचलेलं आठवतं. दोन तीन वर्षातच सगळा भावनिक गोंधळ मागे पडला.परत जायच का हा प्रश्न तरी वाजवी आहे का- उलट्या अर्थाने- इथपर्यंत मजल गेली. पण त्याचवेळी आपण बहुतेक परत जाऊ असंही हळू हळू वाटू लागलं होतं. परत जाऊ ते परंपरागत कर्तव्य म्हणून नाही, तर स्वतःची गरज म्हणून हे जाणवायला लागलं होतं. तसं वाटण्याची कारणं अनेकपदरी होती. हे सर्व वर्णन परस्परविरोधी वाटेल- पण ते तसं नव्हतं. विचारात स्वच्छता आणि पारदर्शकता येत होती. आपण काय करतो यापेक्षा ते आपण का करतो हे जास्त महत्वाचं हे मनोमन पटलं होतं.

अमेरिकेत पोचल्यावर जाणवलं की अरे हा प्रगत देश वाटतो तितका पुढारलेला नाहीच आहे- बऱ्याच बाबतीत तर मागासलेलाच किंवा कूर्मगतीने प्रगत झालेला आहे. आत्यंतिक चंगळवाद आणि त्वरित समाधानाचा- instant gratification चा- अट्टाहास या तर अध्यात्मिक दारिद्र्याच्या खुणा होत्या.   जागतिक राजकारणात दक्षिण अफ्रिकेच्या वर्णविद्वेषाला प्रत्यक्ष विरोध करायला झालेला उशीर, अंतर्गत समाजकारणात कृष्णवर्णियांना समान वागणूक आणि स्त्रियांना मतदानाचा हक्क द्यायला झालेला उशीर- ही काही उदाहरणं.  अगदी रोजची बाब म्हणजे recycling. अमेरिकेतल्या पहिल्याच सकाळी दरवाजाबाहेर जेंव्हा तीस चाळीस पानांची थप्पी रोजचं वर्तमानपत्र म्हणून पडली तेंव्हा मनात म्हटलं- वा, रद्दीचही उत्पन्न इथे बरं येइल. पण कसचं काय! इथलं recycling म्हणजे ही रद्दी तिच्या विवक्षीत recycling bin मधे  टाकणं.मग पुढे त्याचा कागद होइल हे खरं- पण तो पुनर्जन्म होण्याआधी किराणा मालाच्या दुकानात पुड्या बांधण्यासाठी होणाऱ्या पुनर्वापराशी त्याची तुलना नाही! अर्थात आपणही त्याबाबतीत आता बिघडलो आहोत म्हणा.

अमेरिकन प्रछन्न चंगळवादी असोत आणि जागतिक मंचावर अमेरिका हे राष्ट्र सरंजामशाहीवादी असो- वैयक्तिक पातळीवर मात्र अमेरिकेतल्या आयुष्याने नक्कीच नवी आणि बहुआयामी जीवनदृष्टी दिली. तिथे जाण्याआधी भारतामधे सुखाचंच मध्यमवर्गीय जीवन होतं- पण तरी सुध्दा असुरक्षितता सतत घोंघावत असायची. अमेरिकेने सुरक्षितता दिली. व्यावसायिक कामात निखळ समाधान दिलं.

इथल्या मुक्त वैचारिक वातावरणात मुळातच असलेली secular आणि liberal मनोवृत्ती बळकट झाली. जाता जाता हे ही नमूद केले पाहिजे की याच्या बरोबर उलटा परिणाम मी माझ्या काही मित्रांवर होतांना पाहिलेला आहे. “तुमचा अनाहत आम्ही इथे दाखवू शकत नाही. सगळ्या कुटुंबाला एकत्र बसून पाहता येइल असे सिनेमे काढा, आम्ही दाखवू” असं अमोल पालेकरांना सांगणारे माझे एक मित्र आहेत. असो.  तंव्हा असंही जाणवलं की अमेरिकेतल्या भारतियांत एकूण धार्मिक आणि हिंदूत्ववादी विचारसरणीचा प्रभाव वाढत आहे- आणि याबाबत तक्रार असण्याचं खरं तर काही कारण नाही. तसंच भांडवलशाही देशात राहिल्याने कुणाचा मुळातच असलेला समाजवादी आणि साम्यवादी मंडळीवरचा राग वाढला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. पण जेंव्हा हा प्रभाव काही लोकांना असंवेदनशील बनवतो, तेंव्हा फार वाइट वाटतं हे  नक्की.

परंतू या बाबतीत एक अत्यंत आश्वासक गोष्ट अशी की अमेरिकेत जन्मलेल्या दुसऱ्या पिढीने मात्र human rights बाबत अमेरिकन (जनतेचा, देशाचा नव्हे!) वारसा घेतलेला आहे. खाजगी संभाषणात, मातृभाषेतून, चिनी मंडळींचा “चपटे” आणि कृष्णवर्णीयांचा “कल्लू” असा  उल्लेख करणाऱ्या आपल्या पालकांना दटावणारी मुलं भेटली तेंव्हा हा मनोवृत्तितला फरक अधोरेखीत झाला.

पुढील भाग:
गणवेशातून मुक्ती नाही! (भाग ३)
सोन्याची द्वारका (भाग ४)
बॉर्न अगेन सिटीझन (भाग ५) अप्रकाशित.

Advertisements

Written by Abhay Shivgounda Patil

February 19, 2013 at 6:13 am

Posted in Uncategorized

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: